लस सुरक्षित आहे की नाही, हे कोण आणि कसं ठरवतात?

कोरोना : लस सुरक्षित आहे की नाही, हे कोण आणि कसं ठरवतात?

कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आगामी काळात काही सुरक्षित लशी उपलब्ध होऊ शकतात. लोकही लशीची अतिशय आवर्जून प्रतीक्षा करत आहेत. पण आपल्या शरीरात अशा प्रकारची अनोळखी लस टोचून घेण्यास काहींना भीतीही वाटते.

मग लस सुरक्षित आहे की नाही आणि असल्यास ते कोण ठरवतं, याचा आढावा बीबीसीनं घेतला आहे.

लस सुरक्षित आहे का, हे कसं ओळखायचं?

कोणतीही नवी लस किंवा उपचार यांच्या चाचणीआधी शास्त्रज्ञांकडून विचारला जाणारा सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे, लस सुरक्षित आहे किंवा नाही?

माणसावर लशीचा वापर करण्याआधी प्रयोगशाळेत विविध प्रकारचे प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशाळेत आधी पेशींवर चाचणी केली जाते. त्यानंतर प्राण्यांवर आणि नंतर मानवावर त्याचा प्रयोग होतो.

सुरक्षिततेबाबत इतर कोणताही धोका नसेल तरच ही लस पुढच्या टप्प्यात जाते.

चाचणी किती महत्वाची?

प्रयोगशाळेतील लशींची सुरक्षितता चांगली असेल तर ही लस प्रभावी आहे किंवा नाही, याची तपासणी शास्त्रज्ञ करू शकतात. त्यानंतरच मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांवर लशीची चाचणी घेण्यात येते.

त्यातील अर्ध्या लोकांना लस दिली जाते, तर अर्ध्या लोकांना डमी लस देण्यात येते. पण कोणत्या गटाला कोणती लस देण्यात याबाबत शास्त्रज्ञ जाहीर करत नाही. प्रत्येकाची तपासणी स्वतंत्रपणे केली जाते. त्याचे परिणाम तपासले जातात.

कोव्हिडवरील लस ही अत्यंत वेगाने बनवण्यात आली आहे. पण या लशीने कोणताही टप्पा वगळलेला नाही, हे विशेष.

ऑक्सफोर्ड/अॅस्ट्रोझेनेका कोव्हिड लशीची चाचणी करताना हजारो स्वयंसेवकांपैकी एक जण मृत्यूमुखी पडला होता. या घटनेचा तपास करून कारण जाणून घेण्यासाठी लशीची मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.

त्या मृत्यूचा लशीसोबत कोणताच संबंध नाही, हे लक्षात आल्यानंतरच लशीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली.

लस किंवा उपचाराला कोण मंजुरी देतं?

संबंधित देशाच्या सरकारमधील औषध आणि वैद्यकीय उत्पादनांवर देखरेख ठेवणाऱ्या समितीकडून लशीला मंजुरी मिळत असते. लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची खात्री करूनच ही मंजुरी देण्यात येते.

मंजुरीनंतरही लशीबाबत प्रयोग सुरू असतात. लशीचे इतर गंभीर दुष्परिणाम तर नाहीत ना, भविष्यात त्यामुळे इतर काही समस्या निर्माण होण्याची तरी शक्यता नाही, या बाबी तपासणं सतत सुरू असतं.

लसीकरण झालेल्या व्यक्तीला लशीचे दुष्परिणाम जाणवले अथवा त्याबाबत शंका आली तर तो लससंबंधित समितीशी संपर्क साधू शकतो.

कोव्हिड लशीत काय महत्त्वाचं?

सध्या कोव्हिडवरील अनेक लशींची निर्मिती प्रगतीपथावर आहे. त्यापैकी काही लशींमध्ये कोरोना व्हायरसचं कमकुवत स्वरुप आहे.

ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रोझेनेका लशीत एका निरुपद्रवी व्हायरसचं स्वरुप बदलून त्याची कोरोना व्हायरस (Sars-CoV-2) प्रमाणे रचना करण्यात आली आहे.

फायझर/बायोएनटेक आणि मॉडर्ना यांच्या लशी व्हायरसच्या जेनेटिक कोडचा वापर लस बनवण्यासाठी करतात. त्यांना mRNA लशी असं संबोधण्यात येतं.

ते मानवी पेशींचं स्वरूप बदलत नाही. मानवी शरिरात कोव्हिडबाबतची प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी ते मदत करतात.

काही कोव्हिड लशींमध्ये कोरोना व्हायरसची प्रथिनं वापरण्यात येतात. लस अधिक प्रभावी बनवण्यासाठी काही लशींमध्ये अॅल्युमिनिअम किंवा त्यासारखे इतर घटकही वापरले जातात.

लशीमुळे मी आजारी पडू शकतो?

हे घटक कमी प्रमाणात घेतल्यानंतर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतील, याचे कोणतेच पुरावे सध्या उपलब्ध नाहीत.

लशींमुळे तुम्हाला आजार होत नाही. उलट लशींमुळे आपली प्रतिकारशक्ती अधिक बळकट होण्यासाठी मदत होते. आजाराचा संसर्ग झाल्यास पूर्वी झालेल्या लसीकरणाचा आपल्याला फायदा होतो. संबंधित आजाराचा हल्ला परतवून लावण्यास मदत होते.

काही व्यक्तींमध्ये लसीकरणानंतर आजाराची सौम्य लक्षणं दिसतात. स्नायू दुखणं, ताप येणं, अशी लक्षणंही दिसतात.

पण असं होणं सामान्य आहे. लसीकरणानंतर आपल्या शरिराने दिलेली ती प्रतिक्रिया असते.

लशीची अॅलर्जी होण्याचा प्रकारही दुर्मीळ आहे. कोणत्याही मंजूर लशीतील घटकांची यादी आपल्याला देण्यात येते.

सोशल मीडियावर लशींबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. या कोणत्याच दाव्यांना शास्त्रीय आधार नसतो.

कोव्हिड होऊन गेलेल्यांनी लस घ्यावी का?

कोरोनाची लागण होऊन गेलेल्या रुग्णांनीही कोव्हिडची लस घ्यावी, अशीच सूचना मिळण्याची शक्यता आहे.

या रुग्णांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती असली तरी जास्त काळ ती स्मरणात राहील याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अधिक सुरक्षिततेसाठी लसीकरण करून घेतलेलंच बरं.

लशींसाठी प्राण्यांची कत्तल?

काही लशी बनवण्यासाठी लशींची प्राण्यांचा वापर केला जातो. शिंगल लस आणि लहान मुलांना देण्यात येणाऱ्या नेझल फ्लू लशीत डुक्करांच्या जिलेटीनचा अंश असतो.

काही लशीं कोंबडीच्या अंड्यात किंवा त्यांच्या एम्ब्रियोच्या मदतीने बनवल्या जातात.

कोरोना व्हायरसवरील शेकडो लसी सध्या निर्मितीच्या मार्गावर आहेत. लस बनवण्यासाठीच्या प्रयोगादरम्यान कशा प्रकारचे घटक वापरले जात आहेत, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही. पण बहुतांश कोव्हिड लशी या शाकाहारी किंवा व्हीगन पद्धतीने बनवण्यात आलेल्या असतील, असं तज्ज्ञांचं मत आहे.

सर्वांचं लसीकरण झाल्यानंतर पुढे काय?

लस ही कोणत्याही गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते, याचे शास्त्रीय पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत.

कोरोनावर लस आल्यास लोक आजारी पडण्यापासून, लोकांचे जीव जाण्यापासून त्यांना वाचवता येऊ शकतं.

सर्वप्रथम जास्त धोका असलेल्या रुग्णांना लस देण्यात येईल. वयस्कर व्यक्तींना ही लस आधी देण्याचं नियोजन करण्यात येऊ शकतं.

कोरोनाचा प्रसार ही लस किती थांबवू शकेल, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही. लसीमुळे प्रसारही थांबणार असेल, तर कोरोना व्हायरसचा समूळ नायनाट करण्यासाठी लस अत्यंत उपयोगी ठरू शकते.

■ दोन लाखांहून अधिक सब्स्क्राईबर्स
■ श्रीगोंदयाचं सर्वांत मोठ्ठ नेटवर्क
■ माझा श्रीगोंदा™
■ लग्गेच मोफत जॉईन करा
https://Shrigonda.in

Leave a Reply