पक्षांतर केलेल्या नेत्यांची स्थिती सध्या काय?

विधानसभा निवडणुकीआधी पक्षांतर केलेल्या नेत्यांची स्थिती सध्या काय?

❇️ माझा श्रीगोंदा©
💬 डायरेक्ट टू इनबॉक्स

🙋‍♂️अब्दुल सत्तार
🙋‍♂️राधाकृष्ण विखे पाटील
🙋‍♂️गणेश नाईक
🙋‍♂️राणा जगजितसिंह पाटील
🙋‍♂️शिवेंद्रसिंहराजे भोसले पाटील
🙋‍♂️बबनरावजी पाचपुते
🙋‍♂️कालिदास कोळंबकर
🙋‍♂️नितेश राणे
🙋‍♂️गोपीचंद पडळकर

👑मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती नुकतीच झाली. वर्षपूर्तीनंतर सरकारच्या कामगिरीचा कशी झाली, विरोधी पक्ष म्हणून भाजपची कामगिरी कशी झाली याची चर्चा यानिमित्ताने झाली. पण त्याचबरोबर आणखी एका विषयाची उत्सुकता जनसामान्यांना आहे.
ती म्हणजे ज्या नेत्यांनी निवडणुकीआधी पक्षांतर केले होते त्यांची आता काय स्थिती आहे.

👑या निवडणुकीत तब्बल 35 नेत्यांनी पक्षांतर करून महायुतीची उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलं होतं. निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सत्ताधारी भाजप-सेना महायुतीत प्रवेश करण्यासाठी अनेक नेत्यांची रांग लागली होती.
लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेलं प्रचंड यश पाहता विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होईल असा अंदाज लावत अनेकांनी महायुतीत जाणं पसंत केलं.

महायुतीच्या जागावाटपाचं गणित मांडून भाजप-सेनेने हे नेते अक्षरशः वाटून घेतले. या सगळ्यांचा सर्वांत मोठा फटका राष्ट्रवादीला बसला होता.
पण निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्याने समीकरणच बदलून गेलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यामुळे महायुतीत मोठा भाऊ म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजपला आता विरोधात बसावं लागलं आहे.

पण, उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार स्वतःच्याच ओझ्याने, एकमेकांमध्ये पाय अडकून पडणार असल्याचा दावा भाजप नेते वारंवार करताना दिसतात. इतकंच नव्हे पुढच्या दोन-तीन महिन्यात, वर्षभरात हे सरकार पडेल, अशी भाकितंही नेत्यांकडून करण्यात येतात. नेत्यांनी पक्ष सोडून जाऊ नये, यासाठीच भाजप असे दावे करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येतं.

त्यामुळे निवडणुकीच्या एका वर्षानंतर पक्षांतरीत नेत्यांची स्थिती नेमकी काय, हे जाणून घेण्यासाठीचा हा प्रयत्न…

🙋‍♂️अब्दुल सत्तार

पक्षांतर करून मंत्रिपद मिळवलेल्या नेत्याचं सध्याचं एकमेव उदाहरण म्हणजे अब्दुल सत्तार. मूळचे काँग्रेसचे असलेल्या अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीआधी सत्तार यांची तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेटही झाली होती.

मात्र युतीच्या समीकरणात औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा तोडगा निघाला. पण हेच सत्तार यांच्या पथ्यावर पडलं.

त्यांनी आपली आमदारकी तर टिकवलीच. शिवाय, युती तुटली तरी सत्तेत राहण्यात, किंबहुना मंत्रिपद मिळवण्यात अब्दुल सत्तार यांना यश आलं. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास आणि बंदरे या खात्यांचं राज्यमंत्रिपद आहे.

गेल्या वर्षी शपथविधीनंतर काही दिवसांतच अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले होते. त्यांनी राजीनामा दिला, असंही सांगण्यात येत होतं. पण हा वाद नंतर संपुष्टात आल्यांचं सांगितलं जातं.

🙋‍♂️राधाकृष्ण विखे पाटील

विरोधी पक्षनेताच थेट सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील होतो, ही अत्यंत दुर्मीळ घटना असते. पण गेल्या वर्षी हा प्रकारही पाहायला मिळाला.
पाच वर्षं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये दाखल झाले. विधानसभा निवडणुकीच्या पाच महिने आधी त्यांनी मंत्रिपदही भूषवलं.

मुलगा सुजय यांना लोकसभेचं तिकीट देण्यावरून पक्षात मतभेद झाल्यामुळे पक्ष सोडल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सुजय यांनी लोकसभेत विजय मिळवला. पुढे विखे पाटील यांनी विधानसभेचाही गड राखला. पण आता पुन्हा विरोधी पक्षातच बसण्याची वेळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आली आहे. ते काँग्रेसमध्येच असते तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकलं असतं.

🙋‍♂️गणेश नाईक

गणेश नाईक ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखलं जायचं. नव्वदीच्या दशकात शिवसेनेत असलेल्या नाईक यांनी पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं होतं. नवी मुंबई महापालिकेवर त्यांचं वर्चस्व आहे. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी चिरंजीव संदीप नाईक यांच्यासह भाजपची वाट धरली. भाजपने संदीप यांना ऐरोलीतून तिकीट दिलं, मात्र गणेश नाईक यांचं तिकीट नाकारलं.

पण मुलाने वडिलांसाठी आपल्या तिकिटाचा त्याग केला. त्यामुळे संदीप नाईकांच्या ठिकाणी गणेश नाईक स्वतः निवडणुकीला उभे राहिले आणि विजय मिळवला. गणेश नाईक राष्ट्रवादीबरोबर असते तर नक्कीच त्यांनी मंत्रिपदावर दावा केला असता.

🙋‍♂️राणा जगजीत सिंह पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीत सिंह यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का होता. पद्मसिंह पाटील शरद पवार यांचे नातेवाईक आहेत.
राणा जगजितसिंह यांच्या भाजप प्रवेशानंतर काही दिवसांनी अहमदनगरमध्ये शरद पवारांची पत्रकार परिषद झाली होती. यावेळी पत्रकाराने नातेवाईक इतर पक्षात प्रवेश करतात, असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार उद्विग्न झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.
पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीत सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महायुतीच्या जागावाटपामुळे राणा जगजितसिंह यांना आपला पारंपारीक उस्मानाबाद मतदारसंघ सोडावा लागला. त्यांनी तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला. मात्र सत्ता गेल्यामुळे त्याचं गणित बिघडलं आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेलं असल्याने जर राणा जगजितसिंह राष्ट्रवादीतच असते तर त्यांचा मंत्रिपदावर दावा राहिला असता.

🙋‍♂️शिवेंद्रसिंहराजे भोसले

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माजी खासदार उदयनराजे यांच्याशी फारसं पटत नसल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत होतं. पण मात्र शिवेंद्रराजे यांच्या पाठोपाठ उदयनराजेंनीही भाजपवासी झाले.

शिवेंद्रसिंह राजे यांनी 31 जुलैला भाजपमध्ये प्रवेश केला होता.
शिवेंद्रराजे निवडूनही आले मात्र त्यांना पुन्हा विरोधात बसावं लागलं आहे.

🙋‍♂️बबनराव पाचपुते

भाजप आमदार बबनराव पाचपुते यांची कहाणी थोडी वेगळी आहे. पाटील यांनी जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलेला आहे. आघाडी सरकारमध्ये 2009 ते 2014 दरम्यान मंत्री राहिलेल्या बबनराव पाचपुते यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पण त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 2014 ते 2019 या काळात भाजप सत्तेत असला तरी या काळात पाचपुते विधानसभेत नव्हते. पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण यावेळी भाजपला सत्ता राखता आली नाही.

🙋‍♂️कालिदास कोळंबकर

मुंबईतील वडाळा मतदारसंघाचे आमदार यांनी सलग आठवेळा येथून विजय मिळवला आहे. पूर्वी शिवसेनेत असताना कालिदास कोळंबकर यांना राणे समर्थक म्हणून ओळखलं जायचं.

2004 मध्ये राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत कोळंबकर यांनीही काँग्रेसची वाट धरली होती. 2014 च्या निवडणुकीतही कोळंबकर यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. भाजपमध्ये सामील झालेले कालीदास कोळंबकर, मधुकरराव पिचड, शिवेंद्रसिंह भोसले, वैभव पिचड पाच वर्षं विरोधी पक्षात राहिल्यानंतर 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली. त्यांनी त्यांचा मूळ पक्ष शिवसेनेत प्रवेश करावा, अशीही चर्चा त्यांच्या प्रवेशावेळी झाली होती. पण या मतदारसंघात 2014 मध्ये भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली असल्याने भाजपने हा मतदारसंघ सोडला नाही.

2019 मध्ये कोळंबकर यांनी विजय मिळवला. पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश मिळवला असता किंवा मूळ काँग्रेसमध्येच राहिले असते तर काय चित्र असतं?

🙋‍♂️नितेश राणे

राणे कुटुंबीयांना शिवेसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखलं जातं. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी विरोधकाची भूमिका सध्या अंगीकारली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करण्यासाठी ते वारंवार पुढे येत असतात.

नारायण राणे यांनी बराच काळ वाट पाहून विधानसभा निवडणुकीआधी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. नितेश यांना कणकवली येथून भाजपचं तिकीटही मिळालं. पण युती असूनही केवळ राणेविरोधामुळे शिवसेनेने नितेश यांच्याविरुद्ध आपला उमेदवार उभा केला. अखेर निवडणुकीत नितेश राणे यांनी विजय मिळवला. पण त्यांच्यावर पुन्हा विरोधीपक्षातच बसण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षभरात अनेकवेळा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आक्रमक टीका केली. सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी नितेश राणे यांनी मंत्र्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

वरील नेत्यांप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचं युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार जयकुमार गोरे यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत.

बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट नाकारून भाजपकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. तर रायगड जिल्हयातील पेणचे आमदार रवीशेठ पाटील, धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे आमदार काशिराम पावरा यांनी निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या सर्वांचे मूळ पक्ष आता सत्तेत असल्याने यांचं राजकीय समीकरण बदललं आहे.

🙋‍♂️गोपीचंद पडळकर

विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रवास रंजक राहिला आहे. पडळकर हे धनगर आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत असतात. याच मुद्द्यावरून पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपची साथ सोडली होती.
लोकसभेची निवडणूक त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढवली. या निवडणुकीत सांगली मतदारसंघात त्यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसमोर पडळकर यांना पक्षात खेचून आणलं. त्यांना बारामती येथून तिकीटही दिलं. याठिकाणी पडळकर यांचा सपशेल पराभव झाला. पण तरीही भाजपने त्यांना दुर्लक्षित केलं नाही. विधान परिषदेचं सदस्यत्व देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे.

भाजपचा धनगर चेहरा म्हणून पडळकर यांना पुढे आणण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. आज पडळकर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. विरोधकांवर, विशेषतः शरद पवार यांच्यावर आक्रमक शब्दात टीका करण्यावरून ते नेहमी चर्चेत असतात. पडळकर यांच्याप्रमाणेच रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही भाजपने विधान परिषदेवर पाठवलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षात दाखल झाले होते. मात्र त्यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील हे मी अद्याप पक्ष सोडला नाही, असं सांगत असतात.

पराभूत पक्षांतरीत नेत्यांचं राजकारण कोणत्या दिशेने?

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांचं दुःख तर वेगळंच आहे. आमदारकीही मिळाली नाही आणि आपला मूळ पक्ष सत्तेत आला. शिवाय नव्या पक्षातील वातावरणात मिसळताही आलं नाही, अशी द्विधा मनस्थिती सध्या नेत्यांची आहे.
एके काळी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून दिलीप सोपल यांना ओळखलं जायचं. त्यांनी आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठा खात्याचं मंत्रिपदही भूषवलं होतं.

2014 ते 2019 ही एक टर्म विरोधात घालवल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

महाविकास आघाडीचे नेते
निवडणुकीआधी भाजपात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील काँग्रेसच्या कोअर कमिटीचे सदस्य होते. इंदापूरच्या जागेसाठी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत मतभेद झाल्याने त्यांनी भाजपकडून तिकीट मिळवलं. पण त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. येथील आमदार दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनी मंत्रिपदही दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी चिरंजीव आमदार वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मधुकर पिचड हे आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते. पण आमदार वैभव पिचड राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. किरण लहामटे यांनी पराभूत केल्याने हातची आमदारकीही गमवावी लागली आहे.
अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर, पांडुरंग बरोरा, रश्मी बागल आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले शेखर गोरे हे सर्व नेते निवणुकीत पराभूत झाल्यामुळे या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

महाआघाडी धर्मामुळे स्वगृही परतण्यात अडचणी

वरील सर्व नेत्यांसह आमदार निर्मला गावित (काँग्रेस ते शिवसेना), आमदार विलास तरे (बविआ ते शिवसेना), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस ते शिवसेना), दिलीप माने, (काँग्रेस ते शिवसेना) या नेत्यांची पराभूत झाल्यानंतरही कोंडी झाली आहे. महाआघाडी धर्मामुळे त्यांना आता आपल्या स्वगृही परतणं शक्य नाही.

याबाबत ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांनी दैनिक लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला होता. या लेखात मुजावर लिहितात, “सत्ताबदल झाल्यावर भाजप किंवा शिवसेनेचा आधार घेतलेल्या आयाराम-गयारामांना ‘गड्या आपुलाच पक्ष बरा’ असं वाटू लागलं आहे. सत्ता तिथं विजय या न्यायाने अनेक दिग्गज नेते शिवसेना-भाजपमध्ये दाखल झाले होते. पण गेल्या वर्षभरात पूर्वाश्रमींच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंडळींची घालमेल सुरू झाली आहे.

पण शिवसेनेत गेलेल्या नेत्यांना महाविकास आघाडी धर्मामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत घेणं शक्य नाही. त्यामुळे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत अशीही काही नेत्यांची मानसिकता आहे.”

भाजपसमोर मोठं आव्हान, पण आघाडीसमोरही अनेक आव्हानं

पक्षांतराच्या विषयावर राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांच्याशीही बीबीसीने बातचीत केली.
त्यांच्या मते, “पक्षांतर केलेल्या नेत्यांच्या संदर्भात भाजप समोर तर आव्हान आहेच. पण येत्या काळात महाविकास आघाडीसमोरही त्यामुळे आव्हान निर्माण होऊ शकतं.”

ते सांगतात, “निवडणुकीनंतर सत्तांतर होऊन एक वर्ष झालं तरी तीन पक्षांचं हे सरकार टिकलं आहे. काळ जाईल तसे पक्षात दाखल झालेल्या नेत्यांमध्ये चलबिचल वाढू शकते. त्यांना आपल्यासोबत टिकवून ठेवण्याचं आव्हान भाजपसमोर असणार आहे.
“पण आघाडीसमोरचा प्रश्न म्हणजे हे तीन पक्षांचं सरकार आहे. सरकार स्थिर असलं तरी तिन्ही पक्षांची संरचना स्थिर आहे, याकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. पक्षांतर करून शिवसेनेत आलेल्या पण पराभूत झालेल्या नेत्यांवर अजूनही भाजपची नजर असू शकते. कारण एका बाजूला तीन पक्ष आणि दुसऱ्या बाजूला एक पक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे. ”
प्रकाश पवार यांच्या मते, “तीन पक्षांच्या आघाडीत आपल्याला किती स्थान मिळेल हा प्रश्न या नेत्यांसमोर असू शकतो. त्याच प्रमाणे तीन पक्षांच्या गर्दीत आपल्याला किती संधी मिळेल, अशी शंका निर्माण झाल्यास पुन्हा पक्षांतरं दिसण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचंही आव्हान आघाडी सरकारमधील पक्षांकडे आहे.”
📂 : BBC

■ दोन लाखांहून अधिक सब्स्क्राईबर्स
■ श्रीगोंदयाचं सर्वांत मोठ्ठ नेटवर्क
■ माझा श्रीगोंदा®
■ लग्गेच मोफत जॉईन करा
https://Shrigonda.in

3 thoughts on “पक्षांतर केलेल्या नेत्यांची स्थिती सध्या काय?

Leave a Reply