अखेर बारावीची परीक्षा रद्द!!

अखेर बारावीची परीक्षा रद्द;

सीईटीद्वारे पदवी प्रवेश शक्य,

राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर डॉट कॉम

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा.

राज्य सरकारने इयत्ता दहावीपाठोपाठ यंदाची इयत्ता बारावीची परीक्षाही कोरोना संसर्गाच्या असाधारण परिस्थितीमुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी दुपारी केली. दरम्यान, ११ वी प्रवेशाच्या धर्तीवर पदवी अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश घेताना सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेतली जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दुपारी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. बुधवारी शिक्षण विभागाने प्राधिकरणाला तसा प्रस्ताव पाठवला होता. मागील १४ महिने विद्यार्थी अभ्यासाच्या व परीक्षेच्या तणावाखाली आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता व मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी व राज्यातील विविध परीक्षा मंडळांच्या मूल्यमापनामध्ये एकसूत्रता असावी यासाठी राज्य शासनानेही राज्य मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र सामायिक परीक्षेचा पर्याय दिला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही हे निकष लागू केले जाऊ शकतात. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईट परीक्षा असेल, असे सूत्रांकडून समजते. “शालेय शिक्षण विभागाने संबंधित लोकांशी विविध स्तरांवर सखोल चर्चा केली होती. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन परीक्षा रद्द कराव्यात व अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा असाच या बैठकांमधील तज्ज्ञांचा कल होता,’ अशी माहितीही मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

११ वी-१२ वी अंतर्गत परीक्षांचे गुण ग्राह्य धरणार : वडेट्टीवार
“सीबीएसईने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अंतर्गत गुणांच्या आधारे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार राज्य मंडळसुद्धा अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण निकालासाठी ग्राह्य धरू शकते, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

दहावी परीक्षा रद्द : हायकाेर्टाचे शिक्कामोर्तब
मुंबई | महाराष्ट्रातील दहावीची परीक्षा रद्द होण्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडूनही गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. दहावीची परीक्षा रद्द करण्याविरोधात राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका धनंजय कुलकर्णी यांनी मागे घेतली आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यास मुलांच्या आरोग्यावरून धारेवर धरले होते. त्यानंतर कुलकर्णी यांनी याचिका मागे घेतली.

पुण्यातील प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दहावी परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका (पीआयएल) केली हाेती. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार का, असे प्रश्न न्यायालयाने विचारले. याचिका करणारे धनंजय कुलकर्णी कोण आहेत? त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान काय ? यासंदर्भात याचिककर्त्यांच्या वकिलांना विचारणा झाली.

११ वी परीक्षेसाठी सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) होणार आहे. त्या वेळी सर्व विद्यार्थी एका स्तरावर येतील. सीईटीमध्ये भेदभाव होणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले. मात्र राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मूल्यांकनाद्वारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात याचिकाकर्त्यांना कमतरता वाटत असल्यास ते नवीन याचिका करू शकतात, अशी मुभा न्यायालयाने दिली.

मूल्यमापनासाठी स्वतंत्र याचिका करणार : धनंजय कुलकर्णी
न्यायालयाने माझी याचिका फेटाळली नसून मला स्वतंत्र याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. इयत्ता ९ वी आणि १० वीच्या वर्षातील मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना ५०/५० गुण दिले जाणार आहेत. ९ वीची परीक्षा मागच्या वर्षी झालेली नाही. तसेच दोन्ही अभ्यासक्रम वेगळे आहेत. दहावी बहि:स्थ विद्यार्थ्यांची संख्या लाखाच्या पुढे आहे. त्यांच्या मूल्यमापनाचा विषयसुद्धा संदिग्ध आहे. अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेने प्रवेश देण्याच्या मुद्द्याला माझा विरोध आहे आणि राहील. यासंदर्भात मी लवकरच स्वतंत्र याचिका दाखल करणार आहे, असे प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी पुण्यात निवडक पत्रकारांशी झूम मीटिंगद्वारे साधलेल्या संवादात स्पष्ट केले.

सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अपरिहार्य
डाॅ.अ.ल. देशमुख, (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पुणे)
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने उच्च शिक्षणासाठीचे पात्रता निकष काय, हा प्रश्न उपस्थित होणारच आहे. बारावीनंतरच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी त्या त्या विद्याशाखांच्याही प्रवेश परीक्षा घेणे अपरिहार्य होईल. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य वलयांकित विद्याशाखांना अनिवार्य असणाऱ्या नीट, जेईई, सीईटी परीक्षा होतीलच. वेळापत्रक पुढेमागे होईल. पण इतर विद्याशाखांना प्रवेशासाठी देखील कोणत्या न कोणत्या स्वरूपात परीक्षा घेणे आवश्यक ठरेल. याशिवाय जे विद्यार्थी बारावीनंतर परदेशातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतील, त्यांच्या मूल्यांकनाबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे. जे विद्यार्थी मूलभूत विद्याशाखांना (बीए, बी काॅम, बी एस्सी इत्यादी) प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतील, त्यांच्या प्रवेशासाठी संबंधित विद्यापीठे प्रवेश परीक्षा घेऊ शकतील. (उदा.: पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेईल) त्यातील मूल्यांकन लक्षात घेऊन प्रवेश दिले जाऊ शकतात.

Leave a Reply