आत्मचरित्र: तुकाराम (नाना) दरेकर

आमचे मार्गदर्शक, गुरुवर्य, प्राध्यापक तुकारामजी दरेकर यांच्या आत्म्याला शांती लाभो ही नागनाथ चरणी प्रार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली,


नानांचे आत्मचरित्र नानांच्याच शब्दात सर्वांच्या माहितीसाठी खाली देत आहे,नानांचा संपूर्ण जीवन प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे व कायमस्वरूपी राहील,

प्राध्यापक तुकाराम दरेकर : आत्मचरित्र( जीवन प्रवास ) सोमवार दि. १० जून १९६३ रोजी मी *श्रीगोंद्याच्या महादजी शिंदे विद्यालयात इयत्ता ८ वी च्या वर्गात प्रवेश घेतला.* शाळेने पांढरा हाप शर्ट आणि खाकी पँट शिवायला सांगितली. श्रीगोंद्याच्या पूर्वेच्या वेशीतून प्रवेश करताच *भोसले टेलर्सचा* बोर्ड मला दिसला. मी शाळेचा पहिला पोशाख त्यांच्याकडून शिवून घेतला. आता आम्ही दररोज हिरडगाव ते श्रीगोंदा सुमारे ११ कि.मी. पायी जाऊन - येऊन करीत होतो.काही दिवसातच माझ्या आईची आई *सिताबाई एकनाथ भुजबळ (आजी)* हिला माझे पायी जाणे - येणे रुचले नाही. तिने मला १८ इंची निळ्या रंगाची छोटी नवी सायकल *१८० रुपयाला* घेऊन दिली. ती मला चार वर्षे उपयोगी आली. दरम्यान इयत्ता ९ वी पास झाल्यावर *गुरुवार दि.१३ मे १९६५ रोजी माझा विवाह नामदेव नारायण भुजबळ ( रा. हिरडगाव ) यांची कन्या उज्वला हिच्या बरोबर झाला.* त्यानंतर मार्च १९६७ मध्ये मी एस. एस. सी. परीक्षा पास झालो.

जून १९६८ साली मी कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात डीप. एड. (Diploma in Education ) व पी.डी. आर्ट ला प्रवेश घेतला. त्यावेळी पुणे विद्यापिठाने अशी व्यवस्था केली होती की, जो डीप.एड.ला प्रवेश घेईल, त्याने पी.डी.चा इंग्रजीचा पेपर दिल्यास त्या विद्यार्थ्याला प्रथम वर्ष कला (F.Y.B.A.) ला प्रवेश घेता येत असे.मी. डीप. एड. ला ७० टक्के गुण मिळवून कर्जत कॉलेज मध्ये पहिला आणि पुणे विद्यापीठात तिसरा आलो.
भाग २ : नोकरी व शिक्षण

शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी मी डीप.एड.चा शॉर्ट कट शोधला होता. निकाल लागताच मी रयत शिक्षण संस्थेकडे शिक्षकासाठी नोकरीचा अर्ज केला. त्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर होते,आमचे नातेवाईक तांदळी दुमाला येथील श्री. भिकाजी श्रीपती शेळके त्यांना भेटण्यासाठी मी विष्णू आण्णा काळदाते ( चिंचोली काळदात ) आणि माझे मामे सासरे श्री. सर्जेराव गोविंद तापकीर (खांडवी ) व श्री. टिळक काका शेळके ( तांदळी दुमाला ) यांना घेऊन शेळके साहेबांकडे नगरला मुक्कामी गेलो. त्यांना नोकरी देण्याची विंनती केली.त्यांनी पण शब्द दिला. माझी मे १९६८ मध्ये शिक्षक पदासाठी मुलाखतही झाली. आणि मला २७ मे १९६८ रोजी रयत शिक्षण संस्थेकडून नोकरीची ऑर्डर आली. कोंभळी ( ता. कर्जत ) येथे अर्धवेळ लेखनिक म्हणून नेमणूक दिलेली होती.मूळपगार ५० रुपये आणि ३५ रुपये महागाई भत्ता असे एकूण ८५ रुपये महिना मला मिळणार होता.मी शुक्रवार दि. ३१ मे १९६८ रोजी सदरा पायजमा आणि टोपी असा साधा पोशाख घालून सामानाची एक लोखंडी ट्रंक भरून सायकल एस.टी.वर टाकून कर्जतला गेलो. कर्जत वरून दुपारी ४ वा. २० मि. निघणारी कर्जत चिंचोली फाटा, वालवड , कोंभळी मार्गे नगरला जाणाऱ्या गाडीने बसलो व सांयकाळी ५.२० वाजता कोंभळी स्टँडवर उतरलो. मला दुस-या दिवशी १ जून १९६८ रोजी हजर व्हायचे होते. मी माझे मामे सासरे सर्जेराव गोविंद तापकीर ( चावर वस्ती , खांडवी ) यांच्याकडे सायकलवरून मुक्कामाला गेलो. ट्रंक शाळेतच ठेवली.
शाळेचा शिपाई मोहन लक्ष्मण सुरवसे हा कोंभळीचाच राहणारा होता. त्याने मला हजर होतांना चांगले सहकार्य केले. मुख्याध्यापक सोपानराव काशिनाथ खोसे यांनी मला हजर करून घेतले आणि दोनच दिवसांनी त्यांची अकोळनेरला बदली झाली.ज्या दिवशी मी रुजू झालो त्या दिवशी माझे १८ वर्षे वय पूर्ण झालेले होते. एक दिवस कमी असता तरी मला शासकीय नियमाप्रमाणे हजर करून घेता आले नसते.मी कामकाजाला सुरुवात केली. माझ्या अगोदर असणारे क्लार्क के.डी. काळे (श्रीगोंदा ) यांची कोल्हार येथे बदली झाली होती. विविध प्रकारच्या शाळेच्या किर्दी मी डोळ्याघालून घातल्या. कोणता व्यवहार कोणत्या खात्यावर टाकावयाचा ? खतावणी कशी करावयाची ? या गोष्टी मी समजून घेतल्या व मी माझे नियमित काम चोखपणे करू लागलो. मला गणित शिकविण्याचा छंद होता. रजेवर असणा-या शिक्षकांचे तास मी आवडीने घेऊन गणित शिकवित असे. नऊ महिन्याने मार्च १९६९ पासून मला संस्थेने पूर्णवेळ लेखनिक केले.आता माझा पगार दरमहा १६५ रुपये झाला होता.
मी नोकरी सुरु केली आणि कर्जत कॉलेज मध्ये एफ.वाय. बी.ए.ला प्रवेश पण घेतला. त्यावेळी नव्याने सुरु झालेल्या कर्जत कॉलेजला विद्यार्थी मिळत नसत. अनेक माध्यमिक शिक्षकांनी नोकरी करत करत प्रवेश घेतले होते. प्राचार्य म.म. स्वामी यांनी मलाही प्रवेश दिला. मी २ वर्षे कोंभळी येथे काढली. दरम्यान एफ.वाय. आणि एस. वाय. पूर्ण केले.जून १९७० मध्ये माझी बदली नेवासे तालुक्यातील करजगाव येथे झाली.आता टी.वाय.ला प्रवेश देण्यास नवीन आलेले प्राचार्य एस.एन.यादव तयार नव्हते. मला पहिली दोन वर्षे प्रवेश देणारे प्राचार्य म.म. स्वामी मंचरला बदलून गेले होते. मी थेट मंचर गाठले. त्यांना भेटून टी. वाय. बी.ए. ला प्रवेश घेतला. मार्च १९७१ मध्ये मी इतिहास हा विषय घेऊन द्वितीय वर्गात उत्तीर्ण झालो. नियमित कॉलेजला गेलो असतो तरी मी १९७१ लाच बी.ए.. झालो असतो. माझे एकही वर्षे वाया न जाता नोकरी करीत करीत मी बी. ए. ( ऑनर्स ) झालो होतो.
बी.ए. झाल्यावर मी बी.एड. साठी प्रयत्न सुरु केला. श्रीरामपूरचे स्वामी सहजानंद भारती कॉलेज चे प्राचार्य वसंतराव रोकडे यांना भेटलो. माझ्या प्रकृतीकडे पाहून मला त्यांनी सल्ला दिला की, तुम्ही क्लार्क म्हणूनच काम करा. तुम्हाला बी.एड. पेलवणार नाही. हा दगदगीचा कोर्स आहे.सन ७१-७२ साली मला प्रवेश मिळाला नाही. अखेर मी पुन्हा सन ७२-७३ साली प्रवेशासाठी प्रयत्न करून प्राचार्य रोकडे यांना सांगितले की , मी डीप.एड. ला कर्जत कॉलेज मध्ये पहिला आणि विद्यापिठात तिसरा आलो आहे.मला बी.एड. अवघड जाणार नाही. अखेर मला भयाण दुष्काळातच बी.एड.ला प्रवेश मिळाला. मी त्या वर्षी बी.एड.ला ७० टक्के गुण मिळवून श्रीरामपूर महाविद्यालयात प्रथम आणि पुणे विद्यापीठात दुसरा आलो. मी रयत शिक्षण संस्थेकडे माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला.मे १९७३ मध्ये माझी मुलाखत झाली आणि शनिवार दि.१६ जून १९७३ पासून माझी नेमणूक *कोपरगावच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात उपशिक्षक म्हणून झाली.* मी एक वर्षे तिथे काढले वसंतराव वामनराव पंडित हे मला मुख्याध्यापक होते.मी जून १९७४ पासून *काष्टीच्या* जनता विद्यालयात बदली करून घेतली व एम.ए. चा अभ्यास सुरु केला. मे १९७६ मध्ये मी द्वितीय श्रेणीत एम. ए. सुटलो. मी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकपदी बढती मिळण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडे अर्ज केला.ऑगस्ट १९७६ पासून माझी बदली *प्रवरानगरच्या* ज्युनिअर कॉलेज वर झाली.त्या आठवड्यात इतका पाऊस झाला होताकी, नगर मनमाड रस्ता ठिकठिकाणी वाहून गेल्याने वाहतूक बंद होती. मला १ ऑगस्ट १९७६ ला हजर व्हावयाचे होते. मी श्रीगोंद्याहून रेल्वेने श्रीरामपूर गाठले व संगमनेरकडे जाणा-या एस.टी.ने बाभळेश्वरला उतरलो. आणि तेथून पायी प्रवरानगरच्या महात्मा गांधी ज्युनिअर महाविद्यालयात हजर झालो. प्रवरानगरला असताना मी एम.एड.चा सुट्टीतील २ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ठरविले . अहमदनगरच्या बी.एड.कॉलेजचे प्राचार्य डी.जी. प्रताप यांना भेटलो.त्यांनी मला सांगितले एम.एड.चा कोर्स नियमित केला तर एक वर्षाचा आहे. आणि सुट्टीत केला तर दोन वर्षाचा आहे. मला नोकरी सांभाळून हा कोर्स पूर्ण करावयाचा असल्याने मी सुट्टीतील कोर्स निवडला. मे *१९७८ मध्ये मी एम.एड.ला प्रथम श्रेणीत नगर कॉलेज मध्ये प्रथम आणि पुणे विद्यापीठात पांचवा आलो.* आता मी बी.एड.कॉलेजवर बढती मिळण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडे अर्ज केला.माझी पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठाच्या संयुक्त निवड समितीत प्रथम क्रमांकाने निवड झाली. मला बुधवार दि.१ ऑगस्ट १९७९ पासून *श्रीरामपूरच्या* स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात व्याख्याता म्हणून नेमणूक दिली व मी हजर झालो. पुणे विद्यापिठाच्या निवड समितीत नेमलेले विषयतज्ञ प्राचार्य पिंपळखरे हजर नव्हते. या तांत्रिक कारणाने पुणे विद्यापीठाने माझी नेमणूक मान्यता नाकारली. संस्थेने शनिवार दि.११ ऑगस्ट १९७९ पासून माझी बदली शिवाजी विद्यापीठात *सातारच्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन* मध्ये केली.मी तिथे हजर झालो.तेथे प्राचार्य होते एक जबरदस्त व्यक्तिमत्व. रा.सु.पाटील. रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्यांमध्ये दोन गट पडलेले होते. आ.ज्ञा.साळुंखे यांचा एक गट आणि रा.सु.पाटील आणि आण्णासाहेब मगदूम यांचा एक गट. दरम्यान नगर जिल्ह्यातून काही आजीव सदस्य भरावयाचे होते. त्यावेळी विद्यमान आजीव सदस्यांच्या मतदानाने नवीन आजीव सदस्य निवडला जात असे. आनंदराव साळुंखे यांनी नगरमधून *पोपटराव सखाराम ठुबे* यांच्यासह दोन तीन जणांना उमेदवारी दिली. रा. सु. पाटील गटाला नगरमधून उमेदवार मिळत नव्हता. त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि सांगितले तुम्ही आजीव सदस्यासाठी अर्ज भरावयाचा आहे.मी त्यांच्या सूचनेवरून अर्ज भरला. पण सूचक आणि अनुमोदक एकाच गटाचे श्री. ए.के. डुके आणि बी.एस. निकम घेतले. त्यामुळे मी रा.सु. पाटील यांच्या गटाचा उमेदवार आहे हे साळुंखे गटाच्या लक्षात आले. त्या गटाचे संख्याबळ एकने जास्त होते. त्यामुळे मी एक मताने हरलो. आझाद कॉलेज मध्ये असताना मी सायन्स कॉलेज, शिवाजी कॉलेज आणि धनंजय गाडगीळ कॉमर्स कॉलेज मधील नेतृत्व गुणांच्या प्राध्यापकांचा शोध सुरु केला आणि सर्वांची एक बैठक आझाद कॉलेजच्या प्रांगणातील हिरवळीवर आयोजित केली व तेथेच *नोव्हेंबर १९७९ मध्ये रयत सेवक मित्रमंडळाची स्थापना केली.* एक रुपया नाममात्र फी मध्ये सभासद नोंदणी सुरु केली. उत्तम प्रतिसाद मिळू लागताच संस्था पदाधिकारी हादरले व त्यांनी मित्रमंडळाचे सभासद होणारांची नावे संस्थेला कळवावीत नाहीतर त्यांचे राजीनामे घ्यावेत, असे मुख्याध्यापकांना आदेश काढले. भित्र्या रयत सेवकांनी पटापट राजीनामे दिले.काहींनी तर मित्र मंडळाचे सभासद झालेले नसतांना देखील संस्थेकडे राजीनामे पाठविले. तरीही मी स्वत:, डॉ. पी.बी. चव्हाण , प्रा. विलास कदम, प्रा. एस. एस. पाटील, श्री. सौदिकर , प्रा. संभाजीराव देसाई , बी.पी. बोलगे , शरद यादव, डॉ.सुनंदा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रयत सेवक मित्रमंडळाची चांगली बांधणी करून सन *१९८९ मध्ये झालेली रयत सेवक सहकारी बँकेची निवडणूक जिंकली.* संस्था पदाधिका-यांना जबरदस्त हादरा बसला.

मित्रमंडळाला शह देण्यासाठी त्यांनी संस्था धार्जिण्या रयत सेवक संघाची स्थापना केली. आणि सन १९९४ ची रयत सेवक बँकेची निवडणूक रयत सेवक संघ विरुध्द रयत सेवक मित्रमंडळ अशी झाली . संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संघाला पाठबळ दिल्याने व बदल्यांची भीती घातल्याने १७ पैकी तेरा संचालक रयत सेवक संघाचे निवडून आले. आणि चार संचालक रयत सेवक मित्रमंडळाचे निवडून आले. त्यात मी स्वत: , शरद यादव, सुरेश काळे आणि सौ. कुसुम मरकड यांचा समावेश होता. सन १९९९ च्या निवडणुकीत संस्था पदाधिकारी आणि रयत सेवक संघाने मला पाडण्याचा जिकिरीचा प्रयत्न केला. परंतु बँकेच्या सभासदांनी संघाचे १६ आणि मित्रमंडळाचा मी एकमेव संचालक निवडून दिला.डिसेंबर १९७९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. दि. १४ डिसेंबर १९७९ रोजी *मान. यशवंतरावजी चव्हाण साहेव आणि गोविंदरावजी आदिक साहेब सातारच्या सर्किट हाऊसवर आले होते.* मी, चव्हाण साहेबांना भेटलो. श्रीगोंद्याचे माजी सभापती आमचे आजोबा *अहिलाजी पाटील दरेकर* यांची ओळख सांगितली आणि माझे कुटुंब श्रीरामपूरला आहे. मला शिवाजी विद्यापीठाची मान्यता मिळालेली आहे. आता काहीही तांत्रिक अडचण राहिलेली नाही, तरीही संस्था माझी श्रीरामपूरला सोयीची बदली करीत नाही. चव्हाण साहेबांच्या पुढे कर्मवीर आण्णांचे चिरंजीव आप्पासाहेब पाटील बसलेले होते. चव्हाण साहेब त्यांना म्हणाले, संस्था पदाधिकारी असे का वागतात ? सेवकांच्या सोयी का करत नाहीत ? आप्पासाहेब पाटील म्हणाले, साहेब मी लक्ष घालतो आणि उद्याच बदलीची ऑर्डर काढावयास सांगतो. दुसऱ्यादिवशी माझी ऑर्डर आली व १६ डिसेंबर १९७९ पासून मला *श्रीरामपूरच्या* स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बदलले.मी मे १९८१ पर्यत श्रीरामपूरच्या बी.एड. कॉलेजवर काम केले. परंतु मी मित्रमंडळाचा संस्थापक असल्याने संस्थेने मला अतिरिक्त ( सरप्लस ) दाखवून *मंचरला* जुनिअर कॉलेजकडे पदावनत करून बदलले. मी माझ्या अन्यायाच्या विरोधात १ जून १९८१ रोजी श्रीरामपूरच्या बी.एड. कॉलेजपुढे प्राणांतिक उपोषणाला बसलो.जून १९८० मध्ये आमदार झालेले *आ. बबनराव पाचपुते ( श्रीगोंदा )* यांनी माझ्या उपोषणाला पाठिंबा देऊन ते माझ्या समवेत उपोषणाला बसले.

संस्थेचे त्यावेळचे व्हा.चेअरमन ॲड.रावसाहेब शिंदे यांनी उपोषण स्थळी येऊन शब्द दिलाकी, आम्ही प्रा.तुकाराम दरेकर यांचा अन्याय दूर करू. हा माझा सभ्य गृहस्थाचा शब्द मानून उपोषण मागे घ्या. आम्ही उपोषण मागे घेतले. पण ॲड. रावसाहेब शिंदे यांचा शब्द संस्थेच्या सचिवांनी जुमानला नाही. आणि मला मंचरला ज्युनिअर कॉलेजवर हजर व्हावे लागले. तेथे असतांना संस्थेचे चेअरमन मान. शंकररावजी काळे साहेब मंचरला रयत सेवक मित्रमंडळाच्या नेत्यांशी चर्चा करावयास आले. त्यांना शिक्षक मतदार संघातून आमदारकीची उमेदवारी करावयाची होती. आम्ही काळे साहेबांकडे सेवकांच्यावरील अन्यायाची यादी दिली. ज्या यादीत माझाही समावेश होता.त्यांनी आम्हाला ही सर्व कामे मार्गी लावतो, मला तुमच्या संघटनेचा पाठिंबा द्या.आम्ही त्यांना होकारही दिला, परंतु संस्थेचे त्यावेळचे सचिव प्राचार्य आर.डी. गायकवाड यांनी खोडा घालून काळे साहेबांना विरोध केला. दिलेल्या शब्दाप्रमाणे मान. काळे साहेबांनी माझी वरिष्ठ महाविद्यालयात इतिहास विषयासाठी निवड करून मला १ जुलै १९८२ पासून *मंचर* कॉलेज मध्येच व्याख्याता म्हणून नेमणूक दिली. सन १९८३ मध्ये माझी बदली मंचरहून *कोपरगावाला* झाली.तेथे असतांनाच मे १९८४ मध्ये मी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आ. बबनराव पाचपुते यांच्या पॅनेलमधून लढविली आणि *दि.१६ जून १९८४ रोजी मी श्रीगोंदा कारखान्याचा व्हॉईस चेअरमन झालो.* आ.बबनराव पाचपुते चेअरमन झाले.मान. शंकररावजी काळे साहेब यांनी प्रा. ना. स. फरांदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.२५ जून १९८४ रोजी *कोपरगाव* कॉलेजमध्ये माझा सत्कार केला आणि १ जुलै १९८४ पासून माझी बदली *श्रीगोंदा* कॉलेजमध्ये करण्यात आली.कारखान्यातील कारभारामुळे आ.बबनराव पाचपुते आणि माझ्यात संघर्ष सुरु झाला होता.त्यांनी प्राचार्य नामदेवराव वामन यांना हाताशी धरून माझी बदली *श्रीरामपूरच्या* बोरावके महाविद्यालयात केली. मी या घडामोडी मान. शरदश्चंद्र पवार साहेब यांच्या कानावर घातल्यावर मला *कर्जत कॉलेज* मध्ये बदलण्यात आले. माझे बदली प्रकरण संस्थेचे त्यावेळचे *अध्यक्ष वसंतदादा पाटील* यांच्यापर्यंत गेल्याने मला पुन्हा *श्रीरामपूरच्या* बोरावके कॉलेज मध्ये बदलले. मी पुन्हा मान. शरदचंद्र पवार साहेबांना भेटून पुन्हा *कर्जत कॉलेजवर* बदली करून घेतली आणि १८ वर्षे मी *कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात* काम करून १६ जून २००३ पासून *श्रीगोंद्याच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात* बदलून आलो. तेथे *उपप्राचार्य आणि प्रभारी प्राचार्य* म्हणून मार्च २०१० पर्यंत मी काम केले. हक्काच्या १८० दिवसांच्या रजा पगाराची मागणी मी करू नये, म्हणून संस्थेने विद्यापीठ बदलून तीन महिने सोलापूर विद्यापीठाच्या *पंढरपूर* महाविद्यालयात मला बदलले. माझी शिल्लक रजा भोगून *मी ३१ मे २०१० रोजी पांडुरंगाच्या पावन भूमीत निवृत्त झालो.* पंढरपूर कॉलेजमध्ये फक्त तीन दिवस प्रत्यक्ष हजर राहिलो.

भाग ३ : सहकार , राजकारण व समाजकारण सन १९९१ मध्ये मी श्रीगोंदा तालुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लि. श्रीगोंदा ही संस्था श्रीगोंदा येथे काढली. तालुका कार्यक्षेत्र असणारी ही *माझी पहिली पतसंस्था होय.* त्यासाठी मला त्यावेळचे सहकार मंत्री *शंकररावजी कोल्हे साहेब* यांचे सहकार्य लाभले. सन १९९९ मध्ये मी हिरडगाव फाट्यावर *शिवदत्त कृपा डेअरी प्रा. लि. ही संस्था काढली.* दहा हजार लिटर्स क्षमता असणारी ही संस्था आज अडचणीच्या काळातही चालू आहे.

कॉंग्रेस पक्षाचा श्रीगोंदे तालुक्याचा अध्यक्ष, जिल्ह्याचा उपाध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून मी काम केले आहे. जून २००० मध्ये झालेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुरस्कृत उमेदवार म्हणून मी शिक्षक आमदारकीची निवडणूक लढविली. पण छगन भुजबळ यांनी नाशिकच्या नानासाहेब बोरस्ते यांचे काम केले. त्यामुळे माझा पराभव झाला. रयत सेवक बँकेचा १५ वर्षे संचालक आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचा एक वर्षे व्हा.चेअरमन आणि १७ वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. श्रीगोंदा तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचा संस्थापक असून २९ वर्षापासून चेअरमन आहे. शिवदत्त कृपा डेअरी प्रा. लि.. हिरडगाव या संस्थेचा संस्थापक असून गेली २० वर्षे चेअरमन आहे.
आजही मी सामाजिक आणि राजकीय कामात अग्रेसर असतो. दि. १२ सप्टेबर २०१४ रोजी मान. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील भुलाभाई देसाई रोडवरील “ सिल्व्हर ओक इस्टेट “ या निवासस्थानी श्रीगोंदा विधानसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत बबनराव पाचपुते यांच्या विरोधात एकमेव उमेदवार दिल्यास आपण त्यांचा पराभव करू शकतो, हे गेल्या ३४ वर्षातील मतदानाची आकडेवारी दाखवून पवार साहेबांना पटवून दिले. श्रीगोंदे तालुक्यातील इच्छुकांची मोट बांधून एकच उमेदवार कसा देता येईल ? या संबधी अर्धा तास त्यांच्या बरोबर चर्चा केली. शिवाजीराव नागवडे यांना साखर संघाचे अध्यक्षपद, आण्णासाहेब शेलार यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद दिल्यास आणि बाळासाहेब नाहाटा आणि घन:शाम शेलार यांना समजावून सांगितल्यास बबनराव पाचपुते यांच्या बरोबर एकास एक लढत करून आपल्याला आपला उमेदवार निवडून आणता येईल, ही बाब मीच पवार साहेबांना पटवून दिली. आ. राहुल जगताप यांना सर्वांनी निवडून आणले. आम्हा सहा जनांपैकी नागवडे, आण्णासाहेब शेलार , घनःशाम शेलार , आ. राहुल जगताप यांच्या पदरात पदे पडली. बाळासाहेब नाहाटा यांनाही राज्य कृषि उत्पन्न बाजार समितीचे बिनविरोध संचालकही करण्यात आले. दुर्दैवाची बाब म्हणजे या सर्वांची मोट बांधून एकोपा करण्याची मुख्य भूमिका मी निभावली आणि मला मात्र गेल्या पांच वर्षात कोणतेही पद मिळाले नाही. आणि ज्यांच्या पदरात पदे पडली त्यांनीही मला पद मिळवून देण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. उलट काहींनी तर मला कोणतेच पद मिळू नये असे उलटे प्रयत्न केले. ही माझी आजही खंत आहे.
जून २०१० पासून मी निवृत्तीवेतन घेत असून आज मला दरमहा ७६,०००=०० रुपये निवृत्ती वेतन मिळते. दरमहा ८५ रुपये वेतनावर सुरु केलेली नोकरी माझ्या धडपडीने मी निवृत्त होताना दरमहा ८५ हजार रुपये वेतनापर्यंत नेली. क्लार्क, माध्यमिक शिक्षक, ज्युनिअर कॉलेज टिचर, बी.एड. कॉलेजवर लेक्चरर, वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक, उप प्राचार्य आणि प्रभारी प्राचार्य म्हणून एकूण ४२ वर्षे काम केले. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून सर्वात जास्त उच्चांकी सेवा मी केलेली आहे.निवृत्त होऊन आता दहा वर्षे झालेली आहेत.

भाग ४ : कौटुंबिक माहिती माझ्या विवाहाला आता ५५ वर्षे होत आहेत.माझी पत्नी सौ. उज्वला हिने गेली ५५ वर्षे मला उत्तम साथ दिली. नोकरीच्या काळात माझ्या १६ बदल्या झाल्या , त्यावेळी माझ्या कुटुंबाची फारच ओढाताण झाली.पण या धावपळीत माझ्या पत्नीने खंबीरपणे साथ देऊन आमच्या मुलाबाळांना सांभाळले. त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली. ऐन दुष्काळात मी बी.एड.ला असतांना माझी पत्नी सर्व मुलांना घेऊन गावाकडेच राहिली.

मला थोरल्या दोन मुली आणि धाकटी दोन मुले आहेत. माझी थोरली कन्या सौ. अलका सुनिल अनभुले ( चोराची वाडी ) ही बी.एस्सी. बी.एड., एम.ए. एम.एड. असून माझ्यापेक्षा तिच्याकडे बी.एस्सी.ची पदवी जास्त आहे.तिने ३१ वर्षे माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केले असून ती सध्या श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करीत आहे. ५ सप्टेबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने तिला माध्यमिक शिक्षकाचा राज्य पुरस्कार देऊन गौरविलेले आहे. तिला अक्षय आणि श्रेयस अशी दोन मुले असून, अक्षय हा बी.ई.कॉम्पुटर झाला असून पुण्याच्या कॅपस्टोन कंपनीत सर्व्हिस करीत आहे व एम.इ. करीत आहे. दुसरा मुलगा श्रेयस याचा डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम सध्या चालू आहे. बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी तंत्रनिकेतन मध्ये तिसऱ्या सत्राला त्याने ९४.११ टक्के गुण मिळवून तो प्रथम आला आहे.त्याने बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी तंत्रनिकेतन मधील गेल्या ३७ वर्षाचा उच्चांक मोडला आहे. माझी दुसरी मुलगी *अरुणा* रमेश वाकचौरे ( अकोले ) ही एम.ए. बी.एड. असून ती सध्या *केडगाव* ( ता. नगर ) येथील अंबिका विद्यालयामध्ये काम करते. तिची २८ वर्षे सेवा झाली आहे.तिला *रोहन आणि ॠुतुजा* अशी दोन मुले आहेत. रोहन कॉम्पुटर इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण करून , एका कंपनीत नोकरी करीत आहे. तर ॠुतुजा पुणे येथे भारती विद्यापीठात तृतीय वर्षे E & TC या वर्गात शिकत आहे.माझा तिसरा मुलगा *सुनिल* हा एम.ए.( हिंदी ) बी.एड. असून, *श्रीगोंद्याच्या* श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात उपशिक्षक म्हणून काम करीत आहे. त्याला वाद्यकलेची आवड असल्याने शाळेचा सांस्कृतिक विभागही तो पाहत असतो. त्याची नोकरी २२ वर्षे झाली आहे. यु. ट्यूब च्या *अनमोल ग्यान* यावर अनेक *माहिती पट* ( Documentary Film ) त्याने प्रसिध्द केले आहेत. नुकताच श्रीगोंदा येथे पार पडलेला *शेख महंमद महाराजांच्या यात्रा उत्सवाचा* व्हिडीओ तयार करून त्याने यु ट्यूबवर टाकला आहे. त्याची पत्नी सौ. *जयश्री* ही लोणी बु. ( ता. राहता ) येथील दादासाहेब वाबळे यांची कन्या आहे. त्यांना *संकेत आणि तेजस* अशी दोन मुले आहेत. संकेत पदवीधर असून , बांधकामाचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला आहे. तर तेजस १२ वी ( शास्त्र ) मध्ये शिकत आहे. चौथा मुलगा *संतोष* त्याने बी.ए., डी. फार्मसी केलेले असून मेडिकलचा व्यवसाय आणि त्याच बरोबर फ्लॅट सिस्टीमचा व्यवसाय तो करतो. त्याला आयुष आणि वेदिका अशी दोन लहान मुले असून, ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत. त्याची पत्नी सौ. *प्राजक्ता* ही शिरूरच्या श्रीमती मनीषा मुकुंद वारे यांची कन्या असून, तिने एम.एस्सी (कॉम्पुटर सायन्स ) करून ती *श्रीगोंदा* येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात बी.सी. एस. ची *प्राध्यापिका व विभाग प्रमुख* म्हणून काम करीत आहे. माझ्या कुटुंबाची हिरडगाव येथे सुमारे ३८ एकर २६ गुंठे शेती असून, शेती वाटेक-यांकडून करून घेण्याचे काम माझी *पत्नी सौ. उज्वला* ही करीत असते.माझे वडील *आप्पाजी भोलाजी दरेकर* हे १२ एप्रिल २००० रोजी वारले. माझी वयोवृध्द *आई बबईबाई* (वय ९५ वर्षे ) , भाऊ ज्ञानदेव, झुंबर आणि संपत आणि बहिणी *द्वारकाबाई* किसन गुणवरे (हिरडगाव ) व *नंदिनी* रामचंद्र दामगुडे ( हिरडगाव ) असा परिवार आहे.आज दिनांक २१ मार्च २०२० रोजी मी *७०* वर्षे पूर्ण करून ७१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. *माझे अभिष्टचिंतन करणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे व सदैव ॠणी राहीन.*

प्रा. तुकाराम दरेकर
( रा. हिरडगाव ता.श्रीगोंदा ) मोबा. ९४२२९१९६८८ पत्ता :-
प्रा. तुकाराम आप्पाजी दरेकर हनुमाननगर , श्रीगोंदा जि. अहमदनगर
दि.२१ मार्च २०२०
*———०००००००——-

माझा श्रीगोंदा

Leave a Reply