भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख का निवडण्यात आली?

भारताला स्वातंत्र्य मिळून आज 73 वर्षं झाली. ब्रिटिशांनी 150 वर्षं राज्य केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्यपूर्व काळातील शेवटच्या टप्प्यात काय झालं आणि 15 ऑगस्ट या तारखेपर्यंत कसे आलो याचा उहापोह प्रस्तुत लेखात करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

1945 साली दुसरं महायुद्ध संपलं आणि भारताच्या स्वातंत्र्यचळवळीला एक नवीन स्वरुप प्राप्त झालं. 1942 च्या लढ्याने आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वातील Indian National Army (INA) ने भारतीयांची ताकद दाखवून दिली होती. त्यातच ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांची तुरुंगातून मुक्तता करत भारतीय स्वातंत्र्यचळवळीत चैतन्यच निर्माण केलं.

1945 च्या सुमारास भारताीयांमध्ये एक नवा उत्साह संचारला होता. त्यातच INA च्या जनरल शाह नवाज, गार्डियल सिंग धिल्लन, प्रेम सहगल अधिकाऱ्यांवर ब्रिटिशांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यात खटला भरला.
हे अधिकारी आधी ब्रिटिश सैन्यातील भारतीय अधिकारी होते. मात्र त्यांनी ब्रिटिशांबरोबर फितुरी केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट आली. या अधिकाऱ्यांना लोकांनी नायकाचं रुप दिलं. एकूणच भारतीयांच्या मताकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं.

तिथे दुसऱ्या बाजूला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जागतिक पातळीवर मोठे बदल झाले होते. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन (रशिया) जगातले शक्तिशाली देश म्हणून उदयाला आले. या दोन देशांनीही भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दिला.


ब्रिटिशांचा दुसऱ्या महायुद्धात विजय झाला असला तरी संरक्षण आणि आर्थिक पातळीवर त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. इंग्लंडमध्ये सत्तांतर झालं होतं. हुजूर पक्षाऐवजी आता मजूर पक्षाची सत्ता आली होती आणि त्यांनी काँग्रेसच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता. ब्रिटिश सैन्य आता युद्ध करून थकले होतं. मायदेशापासून दूर (म्हणजे भारतातही) राहण्याची त्यांची तयारी नव्हती.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या त्यांच्या प्रशासनातील भारतीय लोकांवर विश्वास उरला नव्हता. भारतीय लोक आता काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. संपूर्ण देशात हरताळ, संप, आंदोलनांचं पीक आलं होतं. भारतीय सैन्यात या बंडखोरीचा शिरकाव झाला होता. सैन्याच्या तिन्ही दलात असलेल्या असंतोषाला 20 जानेवारी 1946 ला कराचीत तोंड फुटलं. ते लोण मुंबई, लाहोर, दिल्ली या ठिकाणी पोहोचलं.

18 फेब्रुवारी 1946 ला तलवार या युद्धनौकेवर स्वातंत्र्ययुद्धाचे निशाण लावले गेले. 19 फेब्रुवारीला आरमारातील शस्त्र घेऊन भारतीय स्वातंत्र्यसैनिक बाहेर पडले. सैनिकांनी ब्रिटिशांचा युनियन जॅक हा झेंडा खाली खेचला आणि त्याजागी तिरंगा उभारला आणि ते ब्रिटिश अधिकाऱ्यांवर तुटून पडले. पुढचे चार दिवस हे रणकंदन मुंबईत सुरू होतं.

कॅबिनेट मिशन

या संपूर्ण चळवळींचा परिपाक असा झाला, की ब्रिटिशांनी मार्च 1946 मध्ये ‘कॅबिनेट मिशन’ भारतात पाठवलं आणि भारतात सत्तांतरणाच्या हालचाली सुरू झाल्या. प्रादेशिक स्वायत्ता आणि एकता अबाधित राहिल अशा प्रकारची योजना त्यांनी मांडली. या योजनेला काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांनीही आधी मान्यता दिली.

मात्र अंतरिम सरकारच्या रचनेबद्दल या दोन पक्षात एकमत होऊ शकलं नाही. या अंतरिम सरकारवर एकसंध भारताची घटना तयार करण्याची जबाबदारी होती. पुढे कॅबिनेट मिशनने ठेवलेल्या प्रस्तावाचा या दोन्ही पक्षांनी वेगळाच अर्थ काढला होता

शेवटी सप्टेंबर 1946 मध्ये अंतरिम कॅबिनेटची स्थापना नेहरुंच्या नेतृत्वाखाली झाली. मुस्लिम लीग आधी या कॅबिनेटमध्ये सहभागी झाली नाही. ऑक्टोबरमध्ये काहीशा निरुत्साहानेच मुस्लीम लीग त्यात सामील झाली.
शेवटी 20 फेब्रुवारी 1947 ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश 30 जून 1948 मध्ये भारत सोडून जातील. विशिष्ट तारखेची घोषणा केल्यामुळे काँग्रेस आणि मुस्लीम लींग यांच्यातला वाद मिटेल ही एक भूमिका ब्रिटिश सरकारची होती. त्याचबरोबर ब्रिटिशांचा आता भारतावर नियंत्रण उरलेलं नाही अशा आशयाचा अहवाल तत्कालीन व्हॉईसरॉय व्हेवेल यांनी ब्रिटिश सरकारकडे पाठवला होता. तोही नाकारणं ब्रिटिश सरकारला शक्य नव्हतं. तसंच ब्रिटिश भारत सोडताहेत यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आधी ही विशिष्ट तारीख निवडण्यात आली.

या बहुप्रतिक्षित घोषणेची तमाम भारतीय वाट पाहत असले तरी स्वातंत्र्याचं क्षितीज अद्यापही दूर होतं. कारण भारताच्या या स्वातंत्र्यलढ्याला एक किनार होती ती हिंदू मुस्लीम संघर्षाची

हिंदू-मुस्लीम संघर्ष

मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ असावेत या मागणीपासून सुरू झालेला हिंदू मुस्लीम संघर्ष 1946 मध्ये टोकाला गेला होता. या दोन धर्मांत प्रचंड हिंसाचार झाला. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. महात्मा गांधी या सर्व प्रकारामुळे प्रचंड व्यथित झाले होते.
पूर्व बंगाल आणि बिहारमध्ये या संघर्षाने उग्र रुप धारण केलेे होते. महात्मा गांधी आणि इतर राष्ट्रीय नेते ही समस्या सोडवण्यासाठी निकराचे प्रयत्न करत होते, मात्र त्यांना यश येत नव्हते.

माऊंटबॅटन यांचा प्रवेश

लॉर्ड लुईस माऊंटबॅटन हे ब्रिटिश सरकारमधील अतिशय महत्त्वाचे अधिकारी होते. दोन्ही जागतिक महायुद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय नेत्यांशी चर्चा करून माऊंटबॅटन यांना पुढच्या वाटाघाटींसाठी भारतात पाठवलं. ते भारतातील शेवटचे व्हॉईसरॉय ठरले.

लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांच्या पत्नीसोबत महात्मा गांधी
भारत स्वतंत्र झाला तरी भारताची फाळणी होणार हे तेव्हापर्यंत स्पष्ट झालं होतं. हिंदू मुस्लीम संघर्ष आणखी तीव्र होऊन रक्तपात होण्यापेक्षा फाळणीला राष्ट्रीय नेत्यांनी मान्यता दिली होती.

माऊंटबॅटन भारतात अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत आले. ब्रिटिश भारत सोडतील पण त्यासाठी एक विशिष्ट तारीख असावी असा आग्रह माऊंटबॅटन यांनीच पंतप्रधान अॅटली यांच्याकडं धरला असं ते सांगतात. कारण विशिष्ट तारीख ठरली नाही तर परिस्थिती बदलणार नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र एक विशिष्ट तारीख असावी असा आग्रह लॉर्ड वेव्हेल यांनी धरल्याचा उल्लेख बिपन चंद्रा यांच्या India’s struggle for Independance या पुस्तकात आढळतो.

माऊंटबॅटन भारतात आल्यावर त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. आधीच्या व्हॉईसरॉयपेक्षा त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अधिक होतं तरीही ते पदोपदी ब्रिटिशांचा सल्ला घेत असत. भारतात जास्तीत जास्त एकी रहावी यासाठी ऑक्टोबर 1947 पर्यंत निकराचे प्रयत्न करत रहावे, असा आदेश त्यांना देण्यात आला होता. मात्र त्यासंदर्भात ते फारसं काही करू शकणार नाही असं त्यांच्या लक्षात आलं होतं. मोहम्मद अली जीना पाकिस्तानच्या मागणीवर अडून बसले होते. ते कोणत्याही स्थितीत ऐकायला तयार नाहीत असं चित्र त्यांनी तयार केलं होतं.

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर त्यांच्या Beyond the lines यांच्या आत्मचरित्रात माऊंटबॅटन यांच्या मन:स्थितीबद्दल लिहितात, “माऊंटबॅटन यांच्यासाठी ही वाटचाल सुरुवातीपासूनच सोपी नव्हती. काँग्रेसच्या नेत्यांना मुस्लीम लीगबरोबर कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करायच्या नव्हत्या. शक्य झाल्यास एकसंध भारत किंवा मग फाळणी हे सूत्र माऊंटबॅटन यांच्या डोक्यात पक्कं होतं.”

या सर्व घडामोडींमुळे भारताला आणखी लवकर स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झालं होतं. 3 जून 1947 ला माऊंटबॅटन यांनी स्वत:ची एक योजना आणली. त्याला ‘माऊंटबॅटन योजना’ म्हणतात. त्यात फाळणीचा उल्लेख होताच. त्याचबरोबर संस्थानांना कुठे जायचं याचं स्वातंत्र्य होतं. तसंच दोन्ही देशांची सीमा ठरवण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात येईल अशा तरतुदी या योजनेत होत्या. पाकिस्तानची घटना लिहिण्यासाठी एक वेगळी समिती असेल या अन्य तरतुदी त्यात होत्या. ब्रिटिश संसदेने या योजनेला मान्यता दिली आणि भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र होणार हे स्पष्ट झालं.

मग 15 ऑगस्टच का?

खरंतर 15 ऑगस्टच का या प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘ फ्रीडम अॅट मिडनाईट’ या पुस्तकात माऊंटबॅटन यांच्या विधानाचा उल्लेख आहे.
ते म्हणतात, “ही तारीख एकदम निवडण्यात आली. खरंतर एका प्रश्ना्च्या उत्तरादाखल मी ती विशिष्ट तारीख जाहीर केली होती. मी या संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार होतो. जेव्हा मला सांगण्यात आलं की आपल्याला एखादी तारीख ठरवायची हे. तेव्हा मला कळलं की ती लवकरच असायला हवी. मी तोपर्यंत फारसा विचार केला नव्हता. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातली तारीख ठरवायची होती हे पक्कं होतं. मग माझ्या मनात 15 ऑगस्ट ही तारीख आली. कारण जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करून दोन वर्षं झाली होती.”

30 जून 1948 ही तारीख ठरली असताना भारताला लवकर स्वातंत्र्य देणं यामागील काही कारणं ज्येष्ठ इतिहासकार बिपन चंद्रा त्यांच्या India’s struggle for independance या पुस्तकात उद्धृत करतात.

त्यांच्या मते भारतातील धार्मिक तेढ हाताळणं ब्रिटिशांना दिवसेंदिवस कठीण झालं होतं. त्यामुळे लवकर स्वातंत्र्य दिलं तर ब्रिटिशांची त्यातून सुटका होईल. काही ब्रिटिश अधिकारी तर इंग्लंडला जाण्यासाठी डोळे लावूनच बसले होते. भारताच्या बाजूनेही ब्रिटिशांवर दबाव होताच. “तुम्ही स्वत:ही नीट राज्य करत नाही आणि आम्हालाही करू देत नाही,” अशी टीका वल्लभभाई पटेल यांनी माऊंटबॅटन यांच्यावर केली होती.
भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी एकसंध भारत अस्तित्वात आला नाहीच. एकसंध भारत असावा अशी आमची इच्छा होती असं वक्तव्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी केलं होतं.

(संदर्भ – Modern India- बिपन चंद्रा, India’s struggle for Independence- Bipan Chandra and others. Freedom at Midnight- Larry Collins and Dominique Lapierre, कथा स्वातंत्र्याची- कुमार केतकर )

स्रोत:bbc

Leave a Reply